सचोटीचा व पारदर्शक कारभार हेच यशस्वी संस्थेचे गमक असल्याचे प्रतिपादन नवनाथ उद्योगसमूह प्रमुख व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे यांनी केले.
करंजेपुल येथील नवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा निंबुत येथील समता पॅलेस येथे अध्यक्ष तानाजीराव सोरटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्या वेळी ते बोलत होते.
पतसंस्थेच्या सचोटीपूर्ण कारभारामुळेच सभासदांना सातत्याने उत्तम लाभांश मिळत असल्याचे सांगत संग्राम सोरटे पुढे म्हणाले की, अडचणीच्या काळात संस्थेने सभासदांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आर्थिक आधार दिला आहे. त्यामुळे सभासदांना शेतीपूरक व्यवसाय करता आला आहे. काटकसरीचा व पारदर्शक कारभार केल्यास संस्था उत्तम चालतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नवनाथ पतसंस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या आर्थिक आढाव्यानुसार एकूण ठेवी ३७ कोटी ४१ लाख, कर्ज वाटप ३१ कोटी ४ लाख, गुंतवणूक १८ कोटी ७ लाख, भागभांडवल ४ कोटी ३३ लाख तर नफा तब्बल १ कोटी ५८ लाख रुपयांचा झाला आहे. संस्थेचे सतत अॅडिट वर्ग अ कायम आहे.
उपाध्यक्ष दादासो रासकर यांनी प्रस्ताविकातून कार्याचा आढावा घेतला तर व्यवस्थापक दिपक कोंडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
या सभेनंतर गोविंद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. मगरवाडी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील पार पडली. या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संजय नेवसे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले. कायदेशीर सल्लागार अॅड. प्रसाद खारतुडे यांची उपस्थिती होती.
लाभांश व मदतकार्य:
• नवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्था करंजे – ८% लाभांश
• गोविंद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. मगरवाडी – १०% लाभांश
• नवनाथ दूधसंस्था – दूध उत्पादकांना प्रति लिटर १ रुपये बोनस (५० पैसे उत्पादकाकडून व ५० पैसे संस्थेकडून)
सामाजिक बांधिलकी जपत नवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने मराठवाडा पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.


0 Comments